Monday 4 May 2015

Aaji

आजी.......

आज ५ मे. आजी तुझा वाढदिवस…. आज तुझं साधारण वय ८८ असेल… असेल असं मी ह्यासाठी म्हणाले कारण माझ्यासाठी तू आजही आहेस … मला तर प्रत्येक वळणावर तू भेटतेस … खरं तर आता ८ वर्ष झाली … पण जखम भरतच नाही माझी …खूप पाउस पडायला लागला कि मला आठवतो तू "गेलीस" तो दिवस… आणि "ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता… " हे गाणं ऐकून ऐकून मी भिजवलेल्या उश्या …

माझ्या जन्मापासून आपण एकमेकांशी जोडलं गेलो… खरंतर तुझं माझं नातं मैत्रिणीचंच… खूप गप्पा मारल्याएत आपण … मला सगळं तूच समजावलंस… तूच शिकवलंस…. माझ्या बाहुलीच्या लग्नाचे दागिने बनवलेस… खाऊ पण बनवून दिलास… माझ्या शाळेतल्या भाषणांची तयारी, माझ्या नाचाची तयारी, वेड्यावाकड्या आवाजात मी गायलेली गाणी… आईपेक्षा नेहमीच तू खूप जवळची होतीस गं… म्हणुन आई ओरडली कि तूच आधार असायचीस ना माझा …

तुला पेटी वाजवायला खूप आवडायची पण त्याकाळी असे शौक चालत नसत घरी … तुझ्या वडिलांनी तुला पेटी नाही शिकू दिली … पण तू शिकलीस पेटी माझ्या रूपातून मला सांगितलस तू शिक मलाच पेटी शिकल्यासारखं वाटेल असं म्हणालीस …मला पेटी सुद्धा घेउन दिलीस… जे जे तुला आवडतं ते सगळं करायचा प्रयत्न केला गं मी…

तू सवय लावलीस कोलंबी भाताची… कोलंबी भात बनवायचीस ना माझ्यासाठी अख्खा टोप भरून… आणि मी दिवसभर खादडायचे नुस्ती… कधी विचार नाही आला मनात कि ७५ वर्षाची बाई हि हे सगळं बनवतांना तिला त्रास होत नसेल का? पण आज कळतंय गं… तुला विचारायला हवं होतं ना गं मी … आता तसा कोलंबी भात जगात कुठेच बनत नाही बघ … ती चव कुठून आणु? … ते प्रेम कुठून आणु?

तुला होता एक विश्वास माझ्यावर… मी काहीच नव्हते तरीही … आज थोडंफार काही जमतंय तर ते बघायला "हि" माझ्याजवळ का नाही?

पण मला भेटतेस तू माझी "गाईड" बनून … पाउस कोसळायला लागला कि… तुझी खूप आठवण आली कि… फार थकले कि…थकून थांबले कि… डोळे मिटले कि… तू भेटतेस मला आजही …कवी ग्रेसच्या त्या कवितेतून आणि हृदयनाथजींच्या आवाजातूनही …….

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता…

                                                                                       भिंगरी  मावशीच्या गोष्टीतून….